‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील तुलनेने कमी रिकव्हरी असणाऱ्या सोमेश्वर साखर कारखान्याने एफआरपी पेक्षा ५६४ रुपये तर माळेगाव साखर कारखान्याने ४९४ रुपये दुसऱ्या हप्त्याच्या स्वरूपात दिले आहे.
यांच्याबरोबरीने राज्यातील अन्य कांही कारखान्यांनीही दुसरा हप्ता दिला आहे. मग साडेबारा टक्क्यांच्या पुढे रिकव्हरी असणाऱ्या कारखान्यांना दुसरा हप्ता द्यायला धाड भरली आहे का?,’ असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी हेरवाड येथील जाहीर सभेत केला. हेरवाड (ता.शिरोळ) येथे ग्रामपंचायतीच्या प्रांगणात सभा झाली.
दरम्यान, रांगोळी येथील आक्रोश पदयात्रेतील सभेत बोलताना शेट्टी म्हणाले, ‘अनेकजण विचारत आहेत, आक्रोश पदयात्रा कशासाठी? आम्ही उसाची कैफियत घेऊन निघालो आहोत. एका दाण्याचे हजार दाणे करणाऱ्या शेतकऱ्यांच्या हितासाठी पदयात्रेत सामील व्हा. खताच्या दरामध्ये एका वर्षात २२ टक्के वाढ झाली आहे. शेतकऱ्याचा उत्पादन खर्च, मजुरी व बियाणाचे दर वाढलेले आहेत. त्यामानाने उसाच्या एफआरपीच्या दरात फक्त शंभर रुपयांची वाढ झाली आहे.
भाजप सरकारने २०१४ साली खतावरील सबसिडी कमी केली. त्यानंतर शेतकऱ्यांचा विरोध पाहून थोडीशी सबसिडी वाढविली आणि मोदी सरकारने खताची सबसिडी वाढविली म्हणून मोदींचा फोटो लावून जाहिरातबाजी केली जात आहे. यापूर्वीच्या सर्वच पंतप्रधानांनी खतावर सबसिडी दिलेली होती, म्हणून खताचे दर नियंत्रणात होते. आज गेल्या पाच वर्षातील शेतकऱ्याचा उत्पादन खर्च आठशे रुपयांनी वाढलेला आहे.
ट्रक चालकास धक्काबुक्की
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आक्रोश पदयात्रा सायंकाळी हुपरीतील जवाहर साखर कारखाना येथे आली.सभा झाल्यानंतर माजी खासदार शेट्टी हे यळगुडच्या दिशेने पदयात्रेसाठी मार्गस्थ झाले. कार्यकर्ते पांगापांग होत असतानाच मालवाहतूक करणारा एक ट्रक जात असल्याचे दिसून आले. कार्यकर्त्यांनी ट्रक अडवून चौकशी केली असता चालकाने साखर नेत असल्याचे सांगितले. त्यामुळे कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला.
त्यांनी लागलीच ट्रकचा ताबा घेत चालकास धक्काबुक्की केली. दरम्यान, हा ट्रक कर्नाटक राज्यातील बागलकोट महालिंगपुर येथून एका खासगी साखर कारखान्यातील साखर पोती घेऊन गुजरातकडे जात होता. पण ऐन आंदोलनादरम्यान त्याची गाठ शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांशी पडली. त्यामुळे गोंधळ निर्माण होऊन वातावरण काहीकाळ तणावपूर्ण बनले होते.