तिरुपती देवस्थान ट्रस्टकडून श्री अंबाबाई देवीला लाखमोलाचे महावस्त्र (शालू) अर्पण

शारदीय नवरात्रोत्सवातील उत्साह आता टीपेला पोचला आहे. आज (गुरुवारी) ललिता पंचमीनिमित्त टेंबलाई टेकडीवर कोहळा फोडण्याचा पारंपरिक विधी होणार आहे. दरम्यान, उत्सवाच्या पहिल्या चार दिवसांतच साडेतीन लाखांहून अधिक भाविकांनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले.

तिरुपती देवस्थान ट्रस्टकडून सकाळी देवीला मानाचे महावस्त्र (शालू) अर्पण करण्यात आले. दिवसभरात याज्ञसेनीराजे छत्रपती, संयोगिताराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, आमदार विनय कोरे आदींनी देवीचे दर्शन घेतले. रात्री पारंपरिक उत्साहात पालखी सोहळा झाला. खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते पालखीपूजन झाले. पालखी कमळाच्या आकारात सजवण्यात आली.

लाखमोलाचे महावस्त्र

तिरुपती देवस्थान ट्रस्टतर्फे प्रत्येक वर्षी नवरात्रोत्सवात अंबाबाईला मानाचे महावस्त्र (शालू) अर्पण केले जाते. आज सकाळी ट्रस्टचे विश्वस्त मिलिंद नार्वेकर, राजेशकुमार शर्मा यांनी ‘गोविंदा-गोविंदा’च्या गजरात शालू अंबाबाई चरणी अर्पण करून देवस्थान समितीकडे सुपूर्द केला. यावेळी देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे, सहसचिव शीतल इंगवले, मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे, तिरुपती देवस्थानचे समन्वयक के. रामाराव आदी उपस्थित होते.

अर्पण केलेल्या शालूची किंमत एक लाख सहा हजार ६७५ रूपये इतकी असून तो नारंगी रंगाचा व सोनेरी जरीकाठाचा नक्षीदार आहे. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडील ओटीही श्री. नार्वेकर यांनी अंबाबाईला अर्पण केली.

श्री अंबाबाई कुष्मांडा रूपात

उत्सवाच्या चौथ्या दिवशी आज श्री अंबाबाईची कुष्मांडा रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. श्री कुष्मांडा देवी ही अष्टभुजादेवी म्हणूनही प्रसिद्ध आहे.

तोफेच्या सलामीनंतर पालखी रवाना

ललिता पंचमी म्हणजे कोहळा पंचमी. ललिता पंचमीच्याच दिवशी श्री अंबाबाईने कोल्हासुराचा वध केला. त्यामुळे त्र्यंबोलीच्या प्रतीक रूप कुमारीच्या पूजनानंतर तिच्या साक्षीने कोहळा फोडला (कुष्मांड बळी) जातो. परंपरेनुसार कुमारीपूजनाचा मान गुरव घराण्याकडे असून यंदा तो नारायणी गुरव या नऊ वर्षीय मुलीला मिळाला आहे.

अंबाबाई भक्त मंडळातर्फे अन्नछत्र

येथील अंबाबाई भक्त मंडळातर्फे उत्सवकाळात अन्नछत्र उपक्रम सुरु आहे. मंडळाचे अध्यक्ष संजय साळोखे, कार्याध्यक्ष डॉ.प्रमोद बुलबुले, दिलीप कोळी, मंगल कट्टी, पद्मा बोन्द्रे, गीता भोईटे, सुमित डोंगरसाने उपस्थित होते.

नवदुर्गा मंदिरातही भाविकांची गर्दी

नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील नवदुर्गा मंदिरातही भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.