कोल्हापूरमध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची कसोटी…..

निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे तसे कोल्हापूर जिल्ह्यात कार्यकर्त्यांना पद वाटप आणि नेत्यांना हवाहवासा वाटणारा निधी वाटपाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मावळत्या पालकमंत्र्यांनी निधी वाटपात भेदभाव केला होता. अन्य पालकमंत्र्यांनाही नाराजीला तोंड द्यावे लागले होते. नूतन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या समवेत झालेल्या बैठकीत पद, निधी वाटपाच्या अपेक्षा वाढल्या असल्याने हे तापलेले प्रकरण गतीने हाताळतानाच उपलब्ध निधी योग्य पद्धतीने खर्च होण्याकडेही कटाक्ष ठेवावा लागणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील निधी वाटपाच मुद्दा अनेकदा वादग्रस्त बनला आहे. जिल्ह्यात सत्तेचे प्रमुख केंद्र असलेल्या पालकमंत्र्यांकडून निधी वाटपात भेदभाव झाला की त्यावेळी टीका झाल्याचेही दिसून आले आहेत. पालकमंत्री पदी चंद्रकांत पाटील असताना जिल्हा परिषदेत दलित वस्ती सुधारणा निधी वाटपाचे अधिकार भाजपच्या तालुका अध्यक्षांना दिले होते.

हा मुद्दा उपस्थित करून जिल्हा परिषद सदस्यांच्या अधिकारावर गदा आणली आहे. हा निर्णय मागे न घेतल्यास जिल्हा परिषदेत घुसून तीव्र आंदोलन करू असा इशारा राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांना २०१९ मध्ये दिला होता. आता हेच मुश्रीफ पालकमंत्री बनले आहेत. ते किती न्यायबुद्धीचे ठरतात हे पाहावे लागणार आहे.