दुष्काळग्रस्त भागातील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.त्यानुसार कोल्हापूर विभागांतर्गत असलेल्या सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांतून नोंदणी केलेल्या एक लाख १६ हजार ९४७ विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. त्यांच्या शुल्काच्या प्रतिपूर्तीची रक्कम पाच कोटी ८४ लाख ७३ हजार ५०० रुपये इतकी होते.
सन २०२३ मध्ये शासनाच्या महसूल आणि वनविभागाने दुष्काळग्रस्त तालुके घोषित केले आहेत. या तालुक्यांमधील राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी, बारावीतील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ आणि परीक्षा शुल्काची प्रतिपूर्तीची योजना सुरू केली.
त्यानुसार कोल्हापूर विभागाअंतर्गत असलेल्या तीन जिल्ह्यांतील दुष्काळग्रस्त भागामधील एकूण १६८६ शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांतील एक लाख १६ हजार ९४७ विद्यार्थ्यांनी या शुल्काच्या प्रतिपूर्तीसाठी शिक्षण मंडळाकडे नोंदणी केली आहे. दरम्यान, राज्यातील दुष्काळग्रस्त भागामधील सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती करण्यासाठी एकूण ३२ कोटी ७ लाख ८७ हजार ४७५ रुपये लागणार आहेत. त्यापैकी ८ कोटी ३० लाख रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी सरकारने मान्यता दिली आहे.
कोल्हापूर विभागातून शुल्क प्रतिपूर्तीसाठी नोंदणी केलेल्या विद्याथ्यांची संख्येनुसार दहावीच्या शुल्काच्या प्रतिपूर्तीची रक्कम तीन कोटी ३९ लाख एक हजार रुपये, तर बारावीची रक्कम दोन कोटी ४४ लाख ८२ हजार ५०० रुपये इतकी होते.