इचलकरंजी-कोल्हापूर रोडवरील डीकेएएससी महाविद्यालय परिसरात दोन दिवसांपूर्वी एस. टी. आणि दुचाकीचा अपघात होऊन एकजण ठार झाला. त्याला सर्वस्वी या परिसरातील अतिक्रमण व त्यामुळे होणारी गर्दी कारणीभूत ठरली. महानगरपालिकेकडून या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारीमुळे अखेर अतिक्रमण निर्मुलन पथकाने या परिसरात सोमवारी मोहिम राबविली.
राजर्षि शाहू पुतळा ते डीकेएएससी महाविद्यालय परिसरात वाहतुकीला अडथळा ठरणारी आणि फुटपाथवर ठाण मांडलेली दोन दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात एकाचा बळी गेल्यानंतर जाग आलेल्या महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथकाने राजर्षि शाहु पुतळा ते डीकेएएससी महाविद्यालय परिसरात अतिक्रमण हटाव मोहिम राबविली. या कारवाईत रस्त्याकडेला अडथळा होणारी व फुटपाथवर ठाण मांडलेली २० अतिक्रमणे काढण्यात आली.
यामध्ये महाविद्यालयाच्या भिंतीलगतच असलेले खाद्यपदार्थाचे गाडे तसेच खाद्यपदार्थांच्या सोयीसाठी केलेले कठडेही फोडण्यात आले. याठिकाणी पुन्हा खाद्यपदार्थाचे गाडे लावल्यास त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारुन गाडे जप्त करुन ते नष्ट केले जातील, असा इशारा अतिक्रमण निर्मुलन पथक प्रमुख सुभाष आवळे यांनी सांगितले. सदर कारवाई मुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.