कोल्हापूर जिल्ह्यात बंदोबस्तासाठी आठ हजार पोलिस, जवानांचा फौजफाटा

विधानसभेसाठी बुधवारी (दि. २०) होणारे मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी स्थानिक पोलिसांसह राज्यातील विविध ठिकाणांहून आलेले पोलिस आणि केंद्रीय सुरक्षा दलाचे सशस्त्र जवान सज्ज झाले आहेत.मतदान प्रक्रियेदरम्यान ८ हजार १५७ पोलिस आणि जवानांचा खडा पहारा राहणार आहे. उपद्रवी केंद्रांवर सशस्त्र दलाचे जवान तैनात केले जाणार आहेत. मंगळवारी (दि. १९) दुपारीच बंदोबस्त मतदान केंद्रांकडे रवाना होणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली.मतदान प्रक्रियेदरम्यान जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था टिकविण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्ताचे काटेकोर नियोजन केले आहे.

जिल्ह्यातील उपद्रवी केंद्रांची स्वतंत्र यादी केली आहे. विशेषत: कागल, कोल्हापूर दक्षिण, उत्तर, इचलकरंजी या मतदारसंघांवर पोलिसांची करडी नजर आहे. सर्वच मतदारसंघांमध्ये चुरशीच्या लढती होत असल्याने काही ठिकाणी वादाचे प्रसंग उद्भवण्याचा धोका आहे. यातील काही उपद्रवी केंद्रांवर पोलिसांसह केंद्रीय सशस्त्र दलाचे जवान तैनात केले जाणार आहेत.

यापूर्वी निवडणुकांमध्ये वाद, गोंधळ झालेल्या गावांमधील राजकीय नेते, राजकीय गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींना कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या संशयितांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही अधीक्षक पंडित यांनी दिला आहे.