इचलकरंजीत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा

मटका व्यवसायातून मिळणाऱ्या पैशासाठी तगादा लावत बाळू गंगाराम कांबळे यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पाचजणांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिकाजी कृष्णात चौगुले ( वय ३८ रा. दत्तनगर), दत्ता मधुकर मुदगल ( वय ४२ रा. भोनेमाळ), प्रमोद शिंगे, अभिजित सुतार व रामदास जाधव ( आचारी) अशी त्यांची नांवे असून या प्रकरणी बाळू कांबळे यांच्या पत्नी कामीनी कांबळे (वय ५० रा. कबनूर) यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी भिकाजी चौगुले व दत्ता मुदगल यांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, अटक केलेल्या दोघांना न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, कबनूर येथील सिध्दार्थ हौसिंग सोसायटीतील बाळू कांबळे यांनी चार दिवसांपूर्वी कबनूरातीलच एका शेतातील झाडास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. कांबळे यांनी आपल्या काळ्या रंगाने शरीरावर काहीजणांची नांवे लिहिली असल्याचे तसेच देणी बाकीचा आकडाही लिहिल्याचे निदर्शनास आले होते.

या प्रकरणी मयत बाळू कांबळे यांची पत्नी कामीनी कांबळे यांनी शिवाजीनगर पोलिसात तक्रार दिली असून भिकाजी चौगुले, दत्ता मुदगल, प्रमोद शिंगे, अभिजित सुतार व रामदास जाधव यांच्या तगाद्याला कंटाळून बाळू कांबळे यांनी आत्महत्या केल्याचे म्हटले आहे.

मटका व्यवसायातून मिळणाऱ्या पैशांमुळे त्यांना त्रास दिला जात होता. तसेच शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी देत आमचे पैसे दे नाहीतर आत्महत्या कर असा तगादा लावला होता. या त्रासाला कंटाळूनच कांबळे यांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पाचजणांपैकी भिकाजी चौगुले व दत्ता मुदगल या दोघांना पुणे येथून अटक करण्यात आली असल्याची माहिती पो. नि. प्रविण खानापुरे यांनी दिली.