लिफ्टच्या बहाण्याने वृद्धेचा ऐवज लुटणाऱ्या युवकाला अटक! १५ दिवसानंतर उलगडा


इस्लामपूरात लिफ्टच्या बहाण्याने वृद्धेचा सोन्याचा ऐवज, रोकड असा ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरणाऱ्या नागेश बापू खडतरे (वय ३०, सध्या रा. मंगळवेढा, सोलापूर, मूळ रा. मुळेगाव, ता. दक्षिण सोलापूर) याला पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्यात मदत करणाऱ्या लक्ष्मी शिवाजी भोसले (रा. मुळेगाव), दीपा सचिन पवार (रा. मोहळ, जि. सोलापूर) या संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शोभा रामचंद्र कांबळे (६५, रा. पेठनाका ) यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

६ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास शोभा या इस्लामपूरकडे जाण्यासाठी पेठनाका येथे थांबल्या होत्या. त्यावेळी एक कार त्यांच्याजवळ येऊन थांबली. कारमध्ये चालक महिला होती. आम्ही इस्लामपूरकडे निघालो आहे, तुम्हाला स्टँडवर सोडतो असे म्हणून वृद्धेला कारमध्ये घेतले. कार काही अंतरावर गेल्यानंतर कारमधील महिलेने शोभा यांना सीटबेल्ट घालण्यास सांगितला. सीटबेल्ट घालताना शोभा गोंधळल्या.

दोघांनी त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवले. प्रशासकीय इमारत परिसरात शोभा या कारमधून उतरल्या. त्यावेळी त्यांच्या गळ्यातील बोरमाळ, कर्णफुले, १ हजार रुपयांची रोकड कारमधील संशयितांनी लांबविल्याचे त्यांच्या लक्षात आले.