आज शरद पवारांची तोफ धडाडणार…..

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात आज शरद पवार यांच्या तीन ठिकाणी प्रचारसभा होणार आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ शरद पवार सभा घेणार आहेत.या सभेसाठी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली आहे. प्रचार सभेत शरद पवार नेमकं काय बोलणार, याकडे सर्वांचं लक्ष असेल.लोकसभेची निवडणूक (Lok Sabha Election 2024) जाहीर झाल्यापासून माढा लोकसभा मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत राहिला आहे. भाजपने या मतदारसंघातून रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात शरद पवारांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.

धैर्यशील मोहिते पाटील हे आधी भाजपमध्ये होते. यंदाच्या निवडणुकीत आपल्याला माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून लोकसभेचं तिकीट मिळणार, अशी त्यांना आशा होती. मात्र, भाजपने रणजितसिंह निंबाळकर यांना सलग दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे मोहिते पाटील नाराज झाले.

त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षात प्रवेश केला. इतकंच नाही, तर मोहिते पाटलांनी महाविकास आघाडीकडून लोकसभेची उमेदवारी देखील मिळवली. आता माढ्यात रणजितसिंह निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील असा सामना रंगणार आहे.माढा लोकसभा मतदारसंघात आपल्याच उमेदवाराचा विजय व्हावा यासाठी महायुती तसेच महाविकास आघाडीचे प्रचारसभा घेत असून मतदारसंघ पिंजून काढत आहेत. दरम्यान, मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ शरद पवार आज माढ्यात तीन मोठ्या सभा घेणार आहेत.

आज शुक्रवारी सकाळी १० वाजता करमाळा येथे शरद पवार पहिली सभा घेणार आहेत. या सभेत करमाळ्याचे शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. दुपारी २ वाजता सांगोला आणि सायंकाळी ५ वाजता पंढरपुरात तिसरी सभा होणार आहे. शरद पवार यांच्या ३ झंझावती सभांनी आज माढा लोकसभा मतदार संघ ढवळून निघणार आहे.