लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्र, कोकणातील जागांवर महाराष्ट्रात मतदान होणार आहे. ७ मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार असून याआधी प्रचाराला वेग आला आहे.सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत धुसफूस होती. काँग्रेस या जागेसाठी आग्रही होतं मात्र शिवसेनेकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.
यानंतर काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या उमेदवारीसाठी काँग्रेस आमदार विश्वजीत कदम प्रयत्नशील होते. शेवटपर्यंत विशाल पाटील यांना काँग्रेसकडून तिकीट दिलं गेलं नाही. आता या घडामोडीनंतर चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी विश्वजीत कदम यांनी भेटीगाठीही सुरू केल्या. दरम्यान, विश्वजीत कदम यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची कोल्हापुरात भेट घेतली.
उद्धव ठाकरे यांची विश्वजीत कदम यांच्यासोबत दोन तास चर्चा झाली.कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचं सांगण्यात येतंय. विश्वजीत कदम म्हणाले की, आमचे वडील स्वर्गीय पतंगराव कदम हे या ठिकाणी अनेक वर्ष पालकमंत्री राहिले. या ठिकाणी अनेक संस्था कॉलेज कोल्हापूरात आहेत. कदम कुटुंबाला शाहू महाराज यांचा आदरच आहे. कोल्हापूरच्या भूमिकेबाबत चर्चा झाली.
विश्वजीत कदम यांना सांगलीच्या जागेबाबत आणि त्यावरून काही चर्चा उद्धव ठाकरे यांच्यासोबत झाली का असा प्रश्न विचारला. यावेळी विश्वजीत कदम यांनी उत्तर देणं टाळलं. दोन तास चर्चा झाल्यानंतर विश्वजीत कदम माध्यमांशी न बोलताच निघून जाणं पसंद केलं.दरम्यान, शिवसेना उबाठा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत विश्वजीत कदम यांनी सांगलीत मविआच्या उमेदवाराविरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे माफी मागितल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिलीय. तसंच सांगलीत बंडखोरी करण्यासाठी माझ्यावर राज्यातील काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याचा दबाव असल्याचंही विश्वजीत कदम यांनी बैठकीत सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.