सांगली जिल्ह्यातील अंत्योदय शिधापत्रिका धारकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक साडी वाटप करण्यात येत आहे. जिल्ह्यात ३० हजार ९९६ साड्यांचे वितरण होणार असून, यापैकी सुमारे ६० टक्के साड्यांचे वितरण पूर्ण करण्यात आल्याची
माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. साड्या वाटपासाठी २४ मार्चपर्यंत मुदत आहे.
या साड्या यंत्रमाग महामंडळाकडून देण्यात आल्या असून, याचे मोफत वितरण करण्यात येत आहे. रेशनवर देण्यात येणाऱ्या या साड्या विविध रंगाच्या आहेत. त्यामुळे महिलांमध्ये आपल्या पसंतीच्या रंगाच्या साड्या निवडताना वाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती मात्र तसा वाद कोठेही झाला नाही. रेशन दुकानदार साड्यांच्या गठ्यातून बाहेर काढून या साड्या देत आहे. महिलांना साडी निवड करण्यास देण्यात येत नाही. २४ मार्चपर्यंत या साड्यांचे वितरण पूर्ण करण्यात येणार आहे. साड्यांचे वितरण सुरळीत करण्यात येत असल्याची माहिती रेशन दुकान संघटनेचे पदाधिकारी बिपिन कदम, दीपक उपाध्ये यांनी दिली. साड्या खराब होणार नाहीत यादृष्टीने त्यांची हाताळणी करा असे निर्देश अन्न, नागरी पुरवठा विभागाने दिले आहेत.