आता डोळे स्कॅनर करून मिळणार धान्य…….

रेशन दुकानातून धान्य घेताना बोटांचे ठसे ई-पॉस मशीनवर येत नाहीत म्हणून रेशन धान्य दुकानातून रिकाम्या हातांनी लाभार्थीना परत जावे लागते. मात्र आता प्रत्येक स्वस्त धान्य दुकानात ‘आय स्कॅनर गन’ असणार आहे.२ जी ऐवजी आता मिळणार ४ जी ई पॉस मशीन रेशन दुकानात येणार आहे. एक वर्षापूर्वी जालना जिल्हा पुरवठा विभागाकडून आधुनिक यंत्रसामग्रीची मागणी करण्यात आली होती. येत्या सोमवारपर्यंत ही यंत्रे पुरवठा विभागाच्या ताब्यात येणार आहेत. यानंतर जालना जिल्ह्यातील १२८० स्वस्त धान्य दुकानांमध्ये वाटप करण्यात येणार आहेत. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अंबड तालुक्यातील १९५ दुकानांसह जिल्ह्यातील १२८० दुकानांमध्ये नवीन ई-पॉस मशीन व आय स्कॅनर गन दिली जाणार आहे.

रेशन धान्य वितरणात पारदर्शकता येण्यासाठी शासनाने ई-पॉस यंत्रणा कार्यान्वित केली. यामध्ये व्यक्तीच्या बोटांचे ठसे घेऊन त्यांना धान्य दिले जाते. जिल्ह्यातील सर्वच रास्तभाव दुकानात ई-पॉस यंत्र आहे. मात्र, काही जणांच्या बोटांवरील रेषा पुसट होतात. विशेषतः गवंडी काम करणाऱ्या व्यक्ती, धुणीभांडी करणाऱ्या महिला यांना ही समस्या जाणवते.

अशा लाभार्थीना कुटुंबातील अन्य व्यक्तींना आणून त्यांचे ठेस देऊन धान्य घ्यावे लागते. यामुळे आता आधुनिक पद्धतीचे ‘आय स्कॅनर गन’ दिले जाणार आहेत. ज्या व्यक्तीच्या हाताचे ठसे ई-पॉस यंत्रावर येणार नाहीत. त्यांचे डोळे स्कॅन करून त्यांना धान्य देण्यात येणार आहे.