इचलकरंजीत खड्डे चुकवताना वाहनधारकांची कसरत

इचलकरंजी शहरात रस्त्यांची कामे पूर्ण होताना राजवाडा चौक ते नदीवेस चौक रस्त्यावरील खड्डे मात्र दुर्लक्षित होत आहेत. दरम्यान, गुजरी कॉर्नर चौक अपघाताचा ब्लॅक स्पॉट झाला आहे. ठराविक अंतरावर येणारे आणि एकाच ठिकाणी असणारे हे खड्डे धोकादायक ठरत आहेत. वाहनचालकांना या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघात नित्याचेच बनले आहेत. रस्ता चांगला दिसत असल्याने वाहनचालक वेगाने जातात.

पुढे मात्र खड्डा समोर दिसताच जोराने ब्रेक दाबतात किंवा खड्ड्यांतून गाडी नेतात. त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. रात्री जीव मुठीत धरून वाहनधारकांना मार्गस्थ व्हावे लागते. गुजरी कॉर्नर चौक रस्त्यावरील खड्ड्यांत अक्षरशः गुरफुटून गेला आहे. रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे जैसे थे असून खड्ड्यांमध्ये येणारी जाणारी वाहने अक्षरश: आपटत आहेत. लगतच्या खड्ड्यांना वळसा घालून सुरक्षित वाट शोधत वाहन काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. प्रत्येक वेळी केवळ खड्ड्यांत मुरूम टाकून खड्डा बुजवण्याचा प्रयत्न केला जातो; मात्र पुन्हा खड्डे उघड्यावर पडत आहेत. अनेक वेळा भागातील नागरिक, व्यावसायिकांवर स्वतःच खड्डे बुजवण्याची वेळ येत आहे. या मार्गावर मागील दोन वर्षांत दोन ते तीन वेळा नव्याने रस्ते करण्यात आले. तरीही खड्डे बुजवून डांबरीकरण न करता खड्डे तसेच राहिले आहेत. याचा मनस्ताप वाहनधारकांना सोसावा लागत आहे.