राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सुट्टी आता लवकरच संपणार असून शाळांना सुरुवात होणार आहे. नवीन शैक्षणिक वर्ष 15 जूनपासून सुरु होणार आहे.याबाबतचे आदेश शालेय शिक्षण विभागाने काढले आहेत. तसेच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील शाळा आठवड्यातून एकदा म्हणजे शनिवारी दप्तराविना भरणार आहेत. त्यामुळे पहिले ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शनिवारी दप्तर नेण्याची आवश्यकता नाही. विद्यार्थ्यांचा विचार करीत यंदाच्या 2024-2025 या शैक्षणिक वर्षापासून धोरणात अनेक बदल करण्यात आले आहेत.
राज्यातील शाळा आता 15 जूनपासून सुरु होणार आहेत. नवीन शैक्षणिक सत्र सुरु होत असताना सकाळी लवकर भरणाऱ्या शाळा आता 9 वाजता भरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांवर मानसिक ताण वाढू नये, तसेच विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत विविध निर्णय घेण्यात येतात.
15 जूनला शाळेचा पहिला दिवस असणार आहे. या दिवशी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ, मिठाई वाटून पहिलीतील विद्यार्थ्यांचे तसेच अन्य विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाणार आहे. 15 जूनला शनिवार आहे. तर रविवार 16 ला आणि 17 तारखेला बकरी ईद असल्याने शाळा सुरु होताच लगेचच दोन दिवस सुट्टी असणार आहे. मंगळवारपासून पुन्हा नियमित शाळा सुरु होतील.
शनिवारी दप्तराविना शाळा
विद्यार्थ्यांवरील ताण कमी व्हावा यासाठी विभागामार्फत शाळांमध्ये विविध उपक्रम घेतले जाणार आहेत. यात ऐतिहासीक तसेच प्रेक्षणीय स्थळांना भेटी, स्काऊट गाईड, योगा, विविध खेळ यावर आधारित शिक्षण दिले जाणार आहे. महत्वाचे म्हणजे शनिवारी विद्यार्थ्यांची शाळा दप्तराविना भरणार आहे. आठवड्यातील पाच दिवस विद्यार्थ्यांना पुस्तकी धडे दिले जाणार आहेत तर शनिवारी विद्यार्थ्यांना शाळेत अन्य उपक्रमाचे धडे दिले जाणार आहेत.
शुक्रवारी निघणार आरटीई प्रवेशाची ऑनलाइन लॉटरी
राज्यात 9 हजार 196 शाळांमध्ये 1 लाख 4 हजार 687 जागां उपलब्ध आहेत आणि प्राप्त झालेले अर्ज हे 25 टक्के जागांच्या क्षमतेपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे अशा स्थितीत लॉटरी पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातात. त्यानुसार 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेची ऑनलाइन लॉटरी शुक्रवारी 7 जून रोजी सकाळी अकरा वाजता महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) पुणे येथे काढण्यात येणार आहे. या सोडतीचे थेट प्रक्षेपण व्हीसीद्वारे करण्यात येणार आहे.