आजपासून मुख्यमंत्री शिंदे दोन दिवस कोल्हापुरात….

कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील मतदान हे ७ मे रोजी होणार आहे. अगदी काहीच दिवस शिल्लक राहिले असल्यामुळे नेतेमंडळीची धामधूम सुरु आहे. कोल्हापूर व हातकणंगले दोन्ही मतदारसंघात प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शनिवारपासून दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. शनिवारी सकाळी सातच्या सुमारास त्यांचे कोल्हापुरात आगमन होणार आहे.

रविवारी ५ तारखेला सायंकाळपर्यंत त्यांचा कोल्हापुरात मुक्काम आहे. दरम्यान, नियोजित दौऱ्यानुसार मुख्यमंत्री शिंदे शुक्रवारी रात्री सातारा, कराडमधून कोल्हापुरात येणार होते परंतु त्यांच्या दौऱ्यात बदल झाला. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खा. संजय मंडलिक आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खा. धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री शिंदे कोल्हापुरात येत आहेत.

मुख्यमंत्री शिंदे यांची इचलकरंजीमध्ये शनिवारी जाहीर सभा होणार आहे. तसेच रविवारी कोल्हापुरातील दसरा चौकातून निघणाऱ्या मोटारसायकल रॅलीमध्ये ते सहभागी होणार आहेत.