सरुडकर व माने यांच्यामध्ये कमालीची चुरस!

हातकणंगले मतदारसंघात उद्धवसेनेचे सत्यजीत पाटील-सरुडकर, शिंदेसेनेचे धैर्यशील माने व स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांच्यातच सामना झाला. तिन्ही उमेदवार तगडे असल्याने येथे काटाजोड लढत होणार हे निश्चित होते; पण पहिल्या फेरीचा निकाल लागला आणि पाटील-सरुडकर यांनी धैर्यशील माने यांच्यावर अवघ्या ६९ ची आघाडी घेतली. शेट्टी तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. त्यानंतरच्या चौथ्या फेरीपर्यंत सरुडकर यांनी ५४९९ चे मताधिक्य घेत आगेकूच सुरू केली; पण पाचव्या फेरीत १४४९चे मताधिक्य घेत माने यांनी आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला.

सहाव्या व सातव्या फेरीत सरुडकर यांनी अनुक्रमे ११०६ व ९० चे आघाडी घेतल्याने माने यांच्या समर्थकांची धाकधूक वाढली. आठव्या व नवव्या फेरीत माने यांनी २११८ चे मताधिक्य घेत निवडणुकीत रंगत आणली. दहाव्या, अकराव्या व बाराव्या फेरीत सरुडकरांनी आघाडी घेतली. मात्र, चौदाव्या फेरीत माने यांनी मुसंडी मारली. त्यानंतरच्या फेरीत सरुडकर व माने यांच्यामध्ये कमालीची चुरस राहिली.

सोळाव्या फेरीपासून माने यांनी निर्णायक विजयाकडे आगेकूच ठेवली होती. फेरीनिहाय मताधिक्याचा लंबक इकडून तिकडे राहिल्याने माने व सरुडकर समर्थकांच्या काळजाचा ठोका चुकत होता. जल्लोष करण्याच्या मानसिकतेत कोणीच दिसत नव्हते. शेवटच्या तीन-चार फेऱ्या राहिल्यानंतरच माने समर्थकांनी जल्लोष सुरू केला.

लोकसभा निवडणूक : २०२४विधानसभानिहाय आघाडी

धैर्यशील माने – आघाडी
हातकणंगले : १७,४९३
इचलकरंजी : ३९,१७२
शिरोळ : ३,२४७

सत्यजीत पाटील – आघाडी
शाहूवाडी : १८,९९७
इस्लामपूर : १७,४८१
शिराळा : ९,२८१