सुळकूड पाणी योजना व कृष्णा नळपाणी योजनेची पाईन लाईन बदलणे या संदर्भात आम. राहुल आवाडे हे नागरिकांची दिशाभूल करून स्टंटबाजी करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीचे सागर चाळके, प्रकाश मोरबाळे व सदा मलाबादे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केला आहे. तसेच सदर काम पूर्ण करण्यासाठी महाविकास आघाडी भविष्यामध्ये लोकशाही मार्गाने लढा देईल, असेही जाहीर केले आहे.
दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात, महाराष्ट्र शासनाने इचलकरंजी शहरासाठी वारणा पाणी योजना रद्द करून सुळकूड पाणी योजना मंजूर केली आहे. सदरची योजना पूर्ण करण्यासाठी इचलकरंजीतील नागरिक सातत्याने आंदोलन करून पाठपुरावा करीत आहे. त्यास अद्यापही यश आले नाही. याची जाणीव माजी आमदार प्रकाश आवाडेंना आहे. त्यांनीही शहरवासियांना शुध्द व मुबलक पाणी मीच देणार, सुळकूड योजना मीच पूर्ण करणार असेही वेळोवेळी खोटी आश्वासने देवूननागरिकांची दिशाभूल केली आहे. राज्यात महायुतीचे सरकार येवून ४ महिने झाले. आम. राहुल आवाडे हे महायुती सरकारचे सदस्य आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सदर कामाचा पाठपुरावा गरजेचे असताना दिशाभूल करण्यासाठी राहुल आवाडे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुद्दा मांडून खोट्या प्रसिध्दीसाठी स्टंटबाजी केली आहे.
कृष्णे योजनेची ५.२ कि.मी. खराब पाईप लाईन बदलण्यासाठी शासनाकडून १९ कोटीचा निधी उपलब्ध झाला आहे. पाईप लाईन बदलण्याचे काम एनर्जी सोल्युशन प्रा.लि. नवी मुंबई मक्तेदार राजेश राजगुरू यांना ९.५० टक्के जादा रकमेने काम मंजूर झाले आहे. सदरचे काम नऊ महिन्यांमध्ये पूर्ण करणे गरजेचे असताना ते अद्याप अपूर्ण आहे. सदर कामापोटी ११ कोटी ६५ लाख रुपये अदा करणेत आले असून ८ कोटी अद्याप देणे बाकी आहेत. मक्तेदार वेळेत काम करत नसल्याच्या कारणावरून कारवाई करावी, अशी मागणी महाविकास आघाडीच्यावतीने करण्यात आली होती. सदरचे मक्तेदारास वर्क ऑर्डर देण्यासाठीमाजी आम. प्रकाश आवाडे यांनी प्रशासनावर राजकीय दबाव टाकला होता. त्या मागचे गौडबंगाल काय? वेळेत काम केले नाही तर दंडात्मक कारवाई करणे किंवा मक्तेदारास काळ्या यादीत नाव टाकणे ही प्रशासनाचे काम असताना नागरिकांची दिशाभूल व स्टंटबाजी करण्यासाठी आम. आवाडेंनी अधिवेशनामध्ये मुद्दा उपस्थित केला असल्याचे म्हटले आहे.