सांगोला तालुक्यात चोरी! भितीचे वातावरण

अलीकडच्या काळात चोरी, मारामारी प्रकरणात खूपच वाढ झालेली पहायला मिळत आहे. सांगोला तालुक्यातील गौडवाडी येथील सोपान जनार्दन गडदे व त्यांच्या शेजारी राहणारे कमल महादेव रुपनर यांचे अज्ञात चोरट्यांनी उघडे असलेल्या घरात जाऊन कपाटातील १ लाख ७२ हजार ९०० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याची घटना मध्यरात्री च्या सुमारास घडल्याने ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या चोरीच्या घटनेबाबत सांगोला पोलीस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी की फिर्यादी सोपान गडदे ( वय ४५. रा. गौडवाडी. ता. सांगोला) हे गावातील त्यांचे नातेवाईक सुरेश शिंगाडे यांच्या घरी गेले होते तेथे गप्पाच्या नादात ते तेथेच थांबले होते त्यानंतर बुधवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास पुतण्या सुयश संतोष गडदे याचा फोन आला व घरात चोरी झाल्याचे सांगितल्यावरून त्वरित घरी आलो चौकशी केली असता उन्हाळ्याचे दिवस असल्याने पत्नी रूपाली ही रात्री अकरा वाजता जेवण
करून बाहेर झोपल्या होत्या. तहान लागली म्हणून रूपाली या घरात पाणी पिण्यासाठी गेले असता कपाटातील साहित्य कपडे अस्ताव्यस्त जमिनीवर पडलेले दिसले.

त्यानंतर कपाटातील सोने चांदी आहे का पाहिले असता कपाटातील १ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याच्या दोन चैन, कानातील सोन्याची झुबे तसेच लहान मुलाचे हातातील सोन्याचे मनगटे, अंगठी, बदाम चांदीचे पैंजण व ७ हजार नऊशे रुपये असे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे दिसून आले त्यानंतर गुरुवारी पहाटे तीन वाजणेच्या सुमारास घराच्या थोड्या अंतरावर कमल महादेव रुपनर यांच्याही घरी त्याच वेळी चोरी झाली असून त्यांचे देखील ४५ हजार रुपये चे सोन्याचे गंठण व गलसर चोरीस गेल्याचे त्यांनी व त्यांच्या मुलांनी सांगितले.

अशा प्रकारे एकाच रात्री १ लाख ७२ हजार ९०० रुपयाची चोरी झाली असून याबाबत सोपान गडदे यांनी सांगोला पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून पुढील तपास सांगोला पोलीस करीत आहेत.