सांगली लोकसभेसाठी मंगळवार, दि. ७ मे रोजी मतदान घेण्यात येत आहे. एकूण २ हजार ४४८ मतदान केंद्रे निर्माण करण्यात आली आहेत. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी जवळपास १३ हजार कर्मचारी नियुक्त केले आहेत. सोमवारी सकाळी ८ वाजल्यापासून ते मतदान संपेपर्यंत म्हणजे ७ मे रोजी सायंकाळपर्यंत कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची ने-आण करण्यासाठी ६६१ वाहने तैनात केली आहेत. यामध्ये एसटी बसेस व इतर वाहनांचा समावेश आहे.
मतदान यंत्रे आणि कर्मचाऱ्यांना ने-आण करण्यासाठी ६६१ वाहनांची व्यवस्था करण्यात आली असून यामध्ये ४१७ एसटी बसेस
तैनात करण्यात आल्या आहेत.सांगली जिल्ह्यात उपलब्ध बसेसपैकी जवळपास ६० टक्के बसेसचे बुकिंग झाल्याने लांब आणि मध्यम पल्ल्याच्या बस वाहतुकीमध्ये कपात करण्यात आली आहे. त्यामुळे सोमवार, दि. ६ व मंगळवार, ७ रोजी बसची वाहतूक व्यवस्था कोलमडणार आहे.
जिल्ह्यात एकूण ७१९ एसटी बसेस असून, यामध्ये जवळपास ६० टक्के म्हणजे ४१७ बसेस निवडणूक कामासाठी तैनात केल्या आहेत. यामध्ये निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी ३५०, पोलिस कर्मचाऱ्यांसाठी ३५ आणि ईव्हीएमसाठी ३२ बसेस तैनात केल्या आहेत, अशी माहिती विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांनी दिली.