सांगलीच्या दुष्काळी भागात चारा प्रश्न गंभीर!

सांगली जिल्ह्यात जसा उन्हाचा पारा वाढत चालला आहे तसा जनावरांच्या दुधात घट होत असल्याचे चित्र आहे. चारा टंचाईची समस्या वाढत चालल्याने चार महिन्यांत दूध उत्पादनात मोठी घट झाली आहे.जानेवारी २०२४ मध्ये प्रतिदिन १८ लाख ६५ हजार ४९५ लिटर दूध संकलन होते.

मे २०२४ मध्ये पहिल्या पंधरवड्यात सरासरी दूध संकलन १५ लाख २८ हजार लिटरपर्यंत घटले आहे.चार महिन्यांत तीन लाख ३७ हजार ३५० लिटरनी घट झाली. दिवसाला गाय दूध दोन लाख लिटर प्रतिलिटर दर २५ रुपये आणि म्हैस दूध दीड लाख लिटर दर ५० रुपये दर धरला तरी दिवसाला सुमारे १.२५ कोटी रुपयांचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे.ग्रामीण भागात जनावरांची संख्या वाढत आहे.

जिल्ह्यात सहकारी १७, तर खासगी ७ दूध संघ आहेत; मात्र दुष्काळी पट्ट्यातील आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगावात चार महिन्यांपासून चारा टंचाईला सामोरे जावे लागत आहे.दूध उत्पादनातील घट, आजारांचे वाढते प्रमाण, चाऱ्याची खालावलेली गुणवत्ता चिंताजनक आहे. दुसऱ्या बाजूला पशुखाद्य, चाऱ्याचे वाढते दर आणि घसरलेल्या दूध दरामुळे पशुपालकांचे अर्थकारण बिघडले आहे. हवामान बदलामुळे गाय, म्हैस दूध उत्पादनात सातत्य ठेवत नाहीत.

हवामान बदलाचा परिणाम पिके उत्पादन, पाणीटंचाई, मानवी आरोग्यापुरता मर्यादित न राहता पशुपालनावर झाल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला फटका बसू लागला आहे. खाद्य दर, कमी होणारा दूध दर यामुळे पशुपालकांचे अर्थकारण अडचणीत आहे.