आज मतदार ठरवणार सांगलीचा खासदार

सांगली लोकसभेसाठी आज मंगळवारी मतदान असून सांगलीचा खासदार जनता ठरविणार आहे. भाजप, शिवसेना व अपक्ष उमेदवारांमध्ये तिरंगी लढत होत असल्याने राज्यात लक्षवेधी ठरली आहे. वसंतदादा घराणे व काँग्रेसला डावलल्याने ही निवडणूक त्यांच्या अस्तित्वाची असेल तर भाजपने दहा वर्षांपूर्वी हस्तगत केलेला काँग्रेसचा हा बालेकिल्ला पुन्हा शाबूत ठेवण्यासाठी भाजपच्या प्रतिष्ठतेची ही निवडणूक होत आहे. सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र २०१४ च्या मोदी लाटेमध्ये भाजपने हा बालेकिल्ला हस्तगत करून काँग्रेसला धक्का दिला आहे. त्यानंतर पुन्हा २०१९ च्या निवडणुकीत भाजपने या ठिकाणी विजय मिळवला.

मात्र यावेळी ही निवडणूक अत्यंत चुरशीची बनली आहे. महायुतीकडून भाजपचे खा. संजयकाका पाटील पुन्हा तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उभे आहेत. भाजप पक्षाने पहिल्या यादीतच खा. पाटील यांची उमेदवारी जाहीर केली होती. तर महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीवरून प्रचंड रामायण घडले होते. काँग्रेसचे जिल्हा नेते आ. विश्वजीत कदम यांनी सांगलीची जागा विशाल पाटील यांना मिळण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. महाविकास आघाडीमध्ये असलेल्या शिवसेना (उबाठा) या घटक पक्षाने कोल्हापुरची शिवसेनेची जागा काँग्रेसला दिली आणि त्या बदल्यात सांगलीची जागा घेतली. सांगली लोकसभेची उमेदवारी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना जाहीर करून टाकली.

यामध्ये महाविकास आघाडीतील नेत्यांना विश्वासात देखील घेतले नाही. त्यामुळे काँग्रेसने नाराजी व्यक्त केली. विशाल पाटील यांना काँग्रेस पक्षातील नेते, पदाधिकारी व कार्यकत्यांनी निवडणूक लढण्याचा आग्रह धरला. त्यानुसार विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सन २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होती. त्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना घटक पक्ष म्हणून सहभागी होते. त्यांनी सांगलीची जागा घेतली, ऐनवेळी विशाल पाटील यांनी स्वाभिमानीच्या चिन्हावर निवडणूक लढवली.

यावर्षी देखील हाच प्रयोग झाला आणि शिवसेना (उबाठा) गटाला जागा गेली. त्यामुळे ही निवडणूक आता कॉंग्रेस कार्यकत्यांनी हाती घेतली आहे. यावेळी तर काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांचा पराभव झाला तर काँग्रेस या मतदारसंघातून हद्दपार होईल. शिवाय दादा घराण्याला देखील मोठा धक्का बसणार आहे. त्यामुळे ही निवडणूक काँग्रेस प्रेमी व दादा घराण्याच्या अस्तित्वाची असणार आहे.