आपल्या सर्वांना माहितच आहे की, सोलापूर जिल्ह्यात पाण्याची तीव्र टंचाई जाणवते. हा भाग दुष्काळी भाग म्हणून जगजाहीर आहे. पाण्यासाठी खूपच वणवण करावी लागते. अशातच सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून १० मे रोजी पाणी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
सोलापूर शहर महानगरपालिकेकडून उजनी धरणातून सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औज व चिंचपूर बंधाऱ्यात पाणी सोडण्याबाबतचे मागणी पत्र देण्यात आलेले आहे. २० मेपर्यंत उजनी धरणातील पाणी वरील बंधाऱ्यात पोहोचल्यास सोलापूर न महापालिकेचा पाणीपुरवठा सुरळीत राहणार आहे.
सोलापूर महापालिका हद्दीतील नागरिकांना महापालिकेच्या वतीने वेळेत पाणी पुरवठा करणे शक्य होणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी १० मे रोजी उजनी धरणातून पाणी सोडण्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देशित केले आहे. हे पाणी औज व चिंचपूर बंधाऱ्यात पोहोचण्यासाठी दहा दिवसाचा कालावधी लागतो. अंदाजे साडेपाच टीएमसी पाणी उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी सोडले जाणार आहे.