आयपीएल स्पर्धेतील 56 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा 20 धावांनी पराभव केला. दिल्लीने या विजयासह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. त्यामुळे आता प्लेऑफची चुरस आणखी रंगतदार झाली आहे. चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांचे प्रत्येकी 12 गुण आहेत. त्यांच्यात फक्त नेट रनरेटचा फरक आहे. त्यामुळे प्लेऑफची लढत रंगतदार वळणावर आली आहे.
राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स सामन्यानंतरही अधिकृतपणे कोणीही क्वॉलिफाय झालं नाही. त्यामुळे अजून काही सामन्यांची वाट पाहावी लागणार आहे. गणिती भाषेत सांगायचं तर कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्य या दोन संघांनी प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं आहे. पण इतर दोन संघांसाठी पाच संघांमध्ये जोरदार रस्सीखेच आहे. आता कोण कोणाचा पत्ता कापतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
कोलकाता नाईट रायडर्स 16 आणि +1.453 नेट रनरेटसह पहिल्या स्थानावर आहे. राजस्थान रॉयल्स 16 गुण आणि +0.476 नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानावर, चेन्नई सुपर किंग्स 12 गुण आणि +0.700 नेट रनरेटसह तिसऱ्या, सनरायझर्स हैदराबाद 12 गुण आणि -0.065 नेट रनरेटसह चौथ्या, दिल्ली कॅपिटल्स 12 गुण
आणि -0.316 नेट रनरेटसह पाचव्या, लखनौ सुपर जायंट्स 12 गुण आणि -0.371 नेट रनरेटसह सहाव्या, आरसीबी 8 गुण आणि -0.049 नेट रनरेटसह सातव्या, पंजाब किंग्स 8 गुण आणि -0.187 नेट रनरेटसह आठव्या, मुंबई इंडियन्स 8 गुण आणि -0.212 नेट रनरेटसह नवव्या, तर गुजरात टायटन्स 8 गुण आणि -1.320 नेट रनरेटसह दहाव्या स्थानी आहे. दरम्यान दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 8 गडी गमवून 221 धावा केल्या. तसेच विजयासाठी 222 धावांचं आव्हान दिलं.
हे आव्हान राजस्थानला काही गाठता आलं नाही. राजस्थान रॉयल्सने 20 षटकात 8 गडी गमवून 201 धावा केल्या. दिल्लीने राजस्थानला 20 धावांनी पराभूत केलं. आता दिल्लीचे अजून दोन सामने शिल्लक आहेत. त्या दौन्ही सामन्यात दिल्लीने विजय मिळवला तर प्लेऑफचं गणित सुटेल. पण एखाद्या सामन्यात पराभव झला तर मात्र कठीण होईल. आता पुढचं सर्व गणित जर तरवर अवलंबून असणार आहे.