तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी कर्मचारी असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. केंद्र सरकारने होळीपूर्वी मार्च महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) वाढ केली होती. यासह केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता किंवा DA ४६ टक्क्यांवरून ५० टक्के झाला होता. पण आता यासोबतच एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीसह इतरही भत्ते वाढले असून यामध्ये निवृत्तीच्या वेळी मिळणाऱ्या ग्रॅच्युइटीचाही समावेश आहे. होय, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युइटी रकमेतही प्रचंड वाढ झाली आहे.सरकारने मार्चमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली त्यासह आता कर्मचाऱ्यांचा डीए ४६ टक्क्यांवरून ५०% झाला. DA वाढल्याने अनेक भत्तेही वाढले. याशिवाय आता सरकारने कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युइटीतही वाढ जाहीर केली आहे.
भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या आदेशानुसार, डीएमध्ये ५०% वाढ करण्यासोबतच सेवानिवृत्ती आणि मृत्यू उपदानाची मर्यादाही २५% वाढवण्यात आली आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की १ जानेवारी २०२४ पासून सेवानिवृत्ती आणि मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा सध्याच्या २० लाख रुपयांवरून २५ लाख रुपये करण्यात आली आहे.सरकारी कर्मचाऱ्यांना नियमांनुसार, जेव्हा महागाई भत्ता (डीए) ५० टक्क्यांवर पोहोचतो तेव्हा ग्रॅच्युइटीसह इतर भत्ते आपोआप वाढतात. महागाई भत्ता ५० टक्क्यांवर पोहोचल्यावर मूळ वेतनात विलीन केले जाईल अशी अटकळ देखील होती मात्र सध्या सरकारने तसे करण्यास नकार दिला आहे.जेव्हा-जेव्हा महागाई भत्त्यात वाढ होते तेव्हा त्यासोबत घरभाडे भत्ता (HRA) यांसह इतरही भत्ते देखील वाढतात.
मात्र, शहरांच्या श्रेणीनुसार HRA वेगवेगळे असतात. सरकारने शहरांच्या X, Y Z श्रेणींमध्ये येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा HRA देखील वाढवला असून कार्मिक मंत्रालयाने यापूर्वी डीए ५० टक्के झाल्यानंतर आता मुलांच्या शिक्षणासाठी वसतिगृह अनुदानाची मर्यादाही वाढवण्याचे आदेशही दिले होते आणि दोन्ही भत्त्यात २५% वाढ करण्यात आली. याशिवाय दिव्यांग महिलांच्या बाल संगोपनासाठीच्या विशेष भत्त्यातही सरकारने सुधारणा केली असून सरकारने केलेल्या भत्त्यांमध्ये सुधारणा १ जानेवारी २०२४ पासून लागू असतील.