‘मित्रानं फसवलं, आता मला जगायची इच्छाच नाही’; WhatsApp Status ठेवून झाला बेपत्ता

‘मला जगण्याची इच्छा नाही’, असा स्टेटस्‌ ‌आपल्या मोबाईल व्हॉटसअॅपवर ठेवून पन्हाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील एका गावातील तरुण शेतकरी गायब झाला. स्टेटस्‌ पाहिल्यानंतर ग्रामस्थांनी त्याचा शोध घेतला. पण तो मिळून आला नाही.

गूळ व्यवसाय अडचणीत आल्याने व मित्राने फसवल्याने मी हा निर्णय घेतल्याचे स्टेटस्‌वर लावल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, पन्हाळा तालुक्याच्या एका गावातील तरुण शेतकरी नेहमीप्रमाणे आज सकाळी घरातून बाहेर पडला तो थेट मार्केट यार्डमध्ये गेला. तेथे त्याला गुळाला दर नसल्याचे लक्षात आले.

शेती व्यवसायातून त्याच्यावर कर्जाचा डोंगर उभारला आहे. त्यात शेतीमालाला भाव नाही, गुळालाही दर येईना. याशिवाय मित्रांनीही घेतलेले पैसे परत न दिल्याने तो नाराज झाला. आज दुपारी त्याने आपले वाहन मार्केट यार्ड भागात उभा केले. तेथेच त्या शेतकऱ्याने ‘ मला जगायचे नाही’ असा स्टेटस आपल्या मोबाईलमधील व्हॉटसअॅपवर ठेवला.

गावातील काहींनी हा स्टेटस्‌ पाहिल्याने साऱ्यांनी त्याच्या घरी धाव घेतली, पण तो मिळाला नाही. या घटनेमुळे त्याचे पत्नी, दोन मुलेही भीतीच्या छायेखाली आहेत. त्याचे मोबाईल लोकेशन हे मार्केट यार्ड दाखवत होते. पण तेथे तो मिळाला नाही. शाहूपुरी पोलिसांनीही याबाबत कोणतीही नोंद नसल्याचे सांगितले.