कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेचा दुचाकीस्वारांना दणका…

कोल्हापुरात शहर वाहतूक नियंत्रण शाखेनं रस्त्यावर अनावश्यकपणे मोठ्या आवाजाच्या सायलेन्सरने दुचाकी चालवणाऱ्यांना दणका दिला आहे. शहर वाहतूक पोलिसांनी सायलेन्सर बदलून वाहन धूम स्टाईलने भरधाव वेगाने चालवणाऱ्यां वाहनचालकांना दणका दिला आहे. दुचाकी वाहनांचे सायलेन्सर बदलून मोठ्या आवाजाचे सायलेन्सर लावून रस्त्यावरून भरधाव वेगाने गाड्या फिरवणाऱ्यांची क्रेझ कोल्हापुरात मोठी आहे. ही क्रेझ शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी मोडून काढत एका दिवसात 33 वाहनांवर कारवाई केली. आज अखेर 132 वाहनांवर कारवाई करून सायलेन्सर जप्त करून एक लाख बत्तीस हजारांचा दंड वसूल केला आहे. शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. 

दरम्यान, ड्रायव्हिंग टेस्ट ड्रायव्हिंग प्रशिक्षण संस्थांना येत्या 1 जूनपासून देण्याची येण्याची शक्यता आहे. वाहन चालविण्यासाठी आवश्यक असलेले ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आरटीओत जाऊन ड्रायव्हिंग टेस्ट देणे आवश्यक आहे. परंतु, आता आरटीओत न जाता ड्रायव्हिंग प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेतच ही टेस्ट देता येणार आहे. त्यासाठी ठराविक संस्थाना मान्यता दिली जाणार असल्याची चर्चा आहे. रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाकडून येत्या 1 जूनपासून नवे नियम लागू होण्याची शक्यता आहे. मात्र, ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्रासाठी किमान आवश्यक असलेल्या नियमांची परिपूर्ती कोल्हापूर प्रादेशिक परिवहन विभागात होणे शक्य नाही. कोल्हापूर प्रादेशिक परिवहन विभागात  कोल्हापूर ,सांगली, सातारा आणि कराड या शहराचा समावेश आहे.