महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्याचे मतदान दोन दिवसापूर्वी पार पडले. हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख तीन उमेदवार महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने हे काही विश्रांतीच्या मनस्थितीत नसल्याचे चित्र आहे.कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघांतील ३० दिवसांच्या प्रचाराची धावपळ संपली.
यानंतर उमेदवारांनी आपली दैनंदिन कामे सुरू केली असून आज तरुण मंडळांनी साजरी केलेल्या शिवजयंती सोहळ्याला भेटी देण्याचे काम सकाळपासूनच सुरू केलं आहे.गेल्या 30 दिवसांपासून घरची भाकरी बांधून निवडणुकीच्या प्रचारात उतरणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) आणि त्यांचे कार्यकर्ते काही काळ निवांत झाले आहेत. मात्र इतक्यावरच न थांबता ते उद्यापासून आभार दौरा सुरू करणार आहेत. काल दिवसभर त्यांनी प्रमुख कार्यकर्त्यांची भेट घेत मतदारसंघातील आढावा घेतला.
कार्यकर्त्यांच्या भावना, मतदानातील डावपेच, प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या हालचाली, कुठे पैशाचा वापर झाला? कुणाला आमिष याबाबतची सविस्तर माहिती पदाधिकाऱ्यांनी शेट्टी यांना दिली.तर महाविकास आघडीचे सत्यजित पाटील-सरूडकर हे आज सकाळपासून त्यांच्या सरूड (ता. शाहूवाडी) येथील घरी होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांच्या चर्चेत भाग घेतला. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील तालुके त्यांच्या मतदारसंघात आहेत.
त्यामुळे तालुका आणि वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघांतूनही कार्यकर्ते त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधत होते. तर महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने हे देखील घरीच थांबून कार्यकर्त्यांशी संपर्क साधत होते. इचलकरंजी रूकडी हुपरी पन्हाळा शाहूवाडी या भागातील कार्यकर्त्यांनी येऊन वस्तुस्थिती सांगितली.