भविष्यात अंबप गावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही आमदार राजूबाबा आवळे यांची ग्वाही

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी खूपच कमी वेळ शिल्लक राहिल्या कारणाने प्रत्येक मतदारसंघांमध्ये जोरदार मोर्चे बांधणी सुरू झालेली आहे. हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार राजूबाबा आवळे यांच्या प्रचारासाठी अंबप येथे पदयात्रा काढण्यात आली. फटाक्यांची आतिषबाजी, वाद्यांचा गजर आणि विजयाच्या घोषणांच्या जल्लोषात काढण्यात आलेल्या या पदयात्रेला युवक, महिला आणि जेष्ठ नागरिक यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. गावातल्या प्रमुख मार्गावरून निघालेल्या या पदयात्रेत आमदार राजूबाबा आवळे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना युवानेते ॲड. राजवर्धन पाटील यांनी गेल्या 15 वर्षातील प्रलंबित असलेली विविध विकासकामे पूर्ण करण्यासाठी आमदार राजू आवळे यांनी ३ कोटी 14 लाख रुपयांचा निधी दिल्याचे सांगितले. त्यांच्या विजयाची जबाबदारी आता मतदारांनी घेतलेली असून त्यांना गावातून विक्रमी मताधिक्य देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

राजू आवळे यांनी सर्व समाजातील लोकांना सोबत घेऊन गावा गावातील विकास कामांसाठी निधी दिल्याचे सांगितलं. अंबप गावाने नेहमीच माझ्या पाठीशी आपली शक्ती उभी केली असून भविष्यात गावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.