सोलापूर शहराला एकीकडे वाढत्या तापमानाचा फटका बसत असताना दुसरीकडे उजनीतील पाणीपातळी वरचेवर घटत आहे. शहराला रविवारपासून (ता. १२) सर्व भागात सरसकट पाच दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
दरम्यान, सोलापूर शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी उजनीतून आज सकाळी नऊपासून १५०० क्युसेक वेगाने सोडण्यात येणार आहे. उजनी धरणातील पाणी पातळी घटल्याने यापूर्वीच दुबार पंपिंगची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
गुरुवारी उजनीतील पाणीपातळी वजा ४३ टक्के होती. साधारणतः वजा ५२ टक्के पाणीपातळी झाल्यानंतर तिबार पंपिंगची यंत्रणा सुरू करावी लागते. या तिबार पंपिंगसाठी आवश्यक साधनसामग्री सज्ज ठेवण्यात आली आहे. उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी सोडण्यात येणारे पाणी २० जुलैपर्यंत पुरवावे लागणार आहे.
त्यामुळे उपलब्ध पाणी काटकसरीने वापरणे गरजेचे आहे. त्यासाठी सोलापूर शहराला १२ मेपासून सरसकट सर्व भागांमध्ये पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा. पाण्याचा अपव्यय टाळावा व महापालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
उजनी धरणातून सोडलेले पाणी २० जुलैपर्यंत जपून वापरावे लागणार आहे. सध्या शहरातील काही भागात ४ दिवसाआड तर काही भागात ५ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी शुक्रवारी १० मे २०२४ रोजी पाणी सोडण्यात येणारे पाणी २० मे दरम्यान पोचणार आहे.
या आवर्तनातील हे पाणी सोलापूर शहरासाठी २० जुलैपर्यंत पुरवावे लागणार आहे. पाऊसकाळ लांबला तरी पाणीपुरवठ्यात व्यत्यय येऊ नये त्यासाठी प्रशासनाकडून आतापासूनच नियोजन करण्यात येत आहे.