इचलकरंजी शहर आणि परिसरात गुरुवारी पारंपारिक , तिथीनुसार शिवजयंती सोहळा री मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने संपूर्ण शहर ह परिसर भगवेमय होऊन गेले होते. भागाभागातून येणाऱ्या शिवज्योती अन् जय भवानी जय शिवाजी च्या जयघोषाने शिवतीर्थ परिसर दणाणून गेला होता.
तर सांयकाळच्या सुमारास विविध मंडळांनी मिरवणुकीचे आयोजन केल्याने मुख्य रस्ता गर्दीने फुलुन गेला होता.पहाटेपासून पंचक्रोशीतील विविध मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवज्योत नेण्यासाठी शिवतीर्थावर मोठी गर्दी केली होती.
त्याचबरोबर दिवसभर विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी हजेरी लावली होती. सायंकाळी मनमोहक आतषबाजी आणि महाप्रसादाचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
शिवजयंतीचे औचित्य साधत दुचाकी, चारचाकीसह मालवाहतूक रिक्षा, प्रवासी रिक्षा आदी वाहनांवर भगवे ध्वज लावण्यात आले होते. शहरातील चौकाचौकात आकर्षक स्टेजची उभारणी करुन त्याठिकाणी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली होती.
सर्वच ठिकाणी छत्रपतींच्या शौर्याचे पोवाडे ऐकू येत होते. तर अनुचित प्रकार घडू नये यासाठी शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने दक्षता घेत ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.