अर्ज चौकशीवरुन भविष्यात दाखल होणाऱ्या गुन्ह्यामधून आरोपींची नावे कमी करण्यासाठी दहा लाखाच्या लाचेची मागणी करुन पहिला हप्ता पाच लाख स्विकारताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडलेले मंगळवेढयाचे पोलीस हवालदार महेश कोळी,पोलीस अंमलदार वैभव घायाळ या दोघांना पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी सेवेतून निलंबीत केले असून हा आदेश नुकताच मंगळवेढा पोलीस प्रशासनास प्राप्त झाला असल्याची माहिती डी. वाय. एस.पी. विक्रांत गायकवाड यांनी दिली.
वरील दोघा पोलीस कर्मचाऱ्यांनी श्री सिध्देश्वर माचणूर मंदिर परिसरात पाच लाखाची लाच घेताना दि.२५ जानेवारी रोजी सांगली लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडून वरील दोघाविरुध्द मंगळवेढा पोलीसात गुन्हा दाखल केला होता. तपासिक अंमलदार सोलापूर लाचलुचपत विभागाचे डी. वाय. एस.पी. गणेश कुंभार यांनी अटक करुन पंढरपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात त्यांना उभे केल्यावर पहिल्यांदा दोन दिवसाची व पुन्हा दोन दिवसाची वाढीव पोलीस कोठडी मिळाली होती.
वरील दोघा विरुध्द गुन्हा दाखल होवून २४ तासापेक्षा ते अधिक काळ कारागृहात राहिल्याने त्यांना पोलीस अधिक्षक यांनी नुकतेच निलंबीत करुन त्यांना सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालय येथे अटॅच करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान त्या दोघा पोलीस कर्मचाऱ्यांना मंगळवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.