राज्यभरात वळवाच्या पावसाचा दणका सुरूच…..

वळवाच्या पावसाने राज्यात चांगलाच दणका दिला आहे. रविवारी (ता. १२) चौथ्या दिवशीही अनेक ठिकाणी पाऊस पडला. तर काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला असून बहुतांश ठिकाणी ढगाळ हवामान होते.मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह हलक्या ते जोरदार स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या.

छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नगर, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, अकोला आदी ठिकाणी शनिवारी (ता. ११) पावसाने हजेरी लावली होती. रविवारीही पुण्यासह काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातही वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.या वळवाच्या पावसाने अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली. तसेच कडब्याची गंजी उडून गेल्याने, भिजल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. विजेच्या तारा तुटून विद्युतपुरवठाही खंडित झाला. तर कोकणामध्ये आंबा-काजूच्या बागांचे मोठे नुकसान झाले असून, बागायतदार हताश झाले आहेत.