थकबाकी वसुलीच्या तगद्याला कंटाळून तरुणाची आत्महत्या! चौघांविरुद्ध गुन्हा

पतसंस्थेकडून घेतलेल्या एक लाख रुपये कर्जापैकी थकीत राहिलेल्या ३३ हजार रुपयांच्या वसुलीसाठी संस्थेचे अधिकारी, कर्मचारी यांनी लावलेल्या तगाद्याला कंटाळून कर्जदार तरुणाने पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.कमलेश दीपक राऊत (वय ३०, रा. जवळा ता. सांगोला) असे आत्महत्या केलेल्या कर्जदार तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवार, १२ मे रोजी सकाळी ९ च्या सुमारास जवळा (ता. सांगोला) येथे घडली.विकास गावडे यांच्या पत्रा शेडमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत तो आढळून आला. याबाबत त्याचा भाऊ वैभव दीपक राऊत यांनी फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी अमोल सावंत, अनिल पवार (दोघेही रा.घेरडी), आनंद खर्जे (रा. हंगिरगे) व चंद्रकांत भगत (रा.वाढेगाव) या आरोपीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.फिर्यादी वैभव राऊत यांचे वडील दीपक राऊत यांना दोन महिन्यांपूर्वी हृदयविकाराचा धक्का बसला होता. त्यांना पैशाची गरजही होती म्हणून मृत कमलेश राऊत यांनी फॅबटेक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह पतसंस्था (शाखा घेरडी) येथून १ लाख रुपये कर्ज घेतले होते.या कर्जापैकी ३३ हजार रुपये कर्ज फेडणे शिल्लक राहिले होते. मागील महिन्यापूर्वी कमलेश, वैभव, विलास गावडे व विकास गावडे हे मिळून जवळा चौकात थांबले होते. त्यावेळी आरोपी आले आणि कमलेश यास राहिलेले कर्ज कधी भरणार आहेस ? कर्ज भरणार नसेल तर आमच्या गाडीवर बस म्हणाले. त्यावेळी कमलेशने शाळा बंद असल्याने पगार नाही.

मी थोड्या दिवसात तुमचे पैसे भरतो अशी विनंती केली होती. त्याचे काही न ऐकता दुचाकीवर बसवून त्याला घेऊन गेले. त्यामुळे तो कर्ज फेडायचे कसे, आता माझ्याकडे पैसे नाहीत, मला आत्महत्येशिवाय पर्याय नाही असे तो भाऊ वैभव, विजय गावडे यांच्यासमोर म्हणाला होता असे फिर्यादीत म्हटले आहे.त्यानंतर कमलेश राऊत याने विकास गावडे यांच्या पत्राशेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जगन्नाथ पवार आहेत.