वाढत्या उकाड्याने सोलापूरकर घामाघूम…..

एप्रिल आणि मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तापमान ४२ अंशांवर पोहोचले होते. रखरखत्या उन्हाचे सकाळी नऊ वाजेपासूनच चटके जाणवत होते. तर दुपारी बाजारपेठेसह रस्त्यांवर शुकशुकाट पाहावयास मिळत होता. गत दोन दिवसांपासून मात्र ढगाळ वातावरणामुळे तापमानात चार अंशाने घसरण झाली असून, सोमवारी ३८ अंश तापमान होते. तर, उकाड्यात मात्र वाढ झाल्याने सोलापूरकर घामाघूम होत आहेत.

सोलापूर शहर जिल्ह्यात एप्रिल महिना आणि मे महिन्याचा पहिला आठवडा हा सर्वाधिक उच्च तापमानाचा राहिला. तर या वर्षातील सर्वाधिक तापमान ४४.४ अंशांवर गेले होते. गेली दोन दिवस झाले या भागात ढगाळ वातावरण निर्माण होऊन तापमानाचा पारा घटल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे काही ठिकाणी अवकाळी पाऊस देखील बरसला.

परिणामी, नऊ मेपासून काही भागांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण होऊन काही अंशी तापमानात घट झाली. असे असले तरी उष्ण दमट वातावरण निर्माण होऊन शरीर घामाने भिजून जात आहे. कधी रखरखते ऊन, तर कधी ढगाळ वातावरण अशा बदलत्या वातावरणाचा त्रास अबालवृद्धांना होत आहे.

मागील आठवड्यापासून रुग्णसंख्येत भर पडली असून, शासकीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांच्या ओपीडीत वाढ झाली आहे. ताप, सर्दी, खोकल्यासह अंगदुखीचे रुग्ण वाढल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. दरम्यान, तीन ते चार दिवसांत अवकाळी पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

हा पाऊस पडला तर नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून तापमानात जोरदार वाढ होऊन पुन्हा ४४ अंशांपर्यंत तापमान पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ४२ अंश तापमान गेले होते. त्यामुळे सातत्याने उष्ण राहिलेला महिना म्हणून एप्रिल व मे महिन्याचा पहिल्या आठवड्याची नोंद झाली.