पंढरपूर येथे अनेक भाविक भक्त विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येत असतात. तसेच आषाढी, कार्तिकी, माघ या एकाद्शींना अलोट गर्दी पहायला मिळते. सध्या माघ वारीनिमित्त अनेक भक्त पंढरपूरकडे रवाना झालेले आहेत. श्रीक्षेत्र पंढरपूर येथे संपन्न होणाऱ्या माघी यात्रेनिमित्त शहरातील सार्वजनिक शांतता राखणे आवश्यक आहे. त्यामुळे शहरातील सर्व देशी, विदेशी, किरकोळ मद्य, ताडी विक्री येत्या मंगळवारी (दि. २०) बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.
महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियममधील कलम १४२ मधील अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी आदेश जारी केले आहे. मंगळवारी संपूर्ण दिवस पंढरपूर शहरातील देशी, विदेशी मद्य व ताडी विक्री व्यवहार बंद ठेवावेत, असे आदेश दिले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.