सोलापूरच्या गारमेंटमध्ये देशाच्या सैनिकांसाठी गणवेश तयार करण्याची शक्ती

सोलापूरच्या गारमेंट उद्योजकांमध्ये देशाच्या सैनिकांसाठी गणवेश तयार करण्याची शक्ती आहे. सोलापुरातील कामगार कौशल्यपूर्ण आहेत, असा गौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली निवडणुकीच्या वेळी सोलापूरच्या दौऱ्यात केला होता.

प्रत्यक्षात सोलापूरच्या गारमेंट उद्योगाला याचा फायदा घेता येण्यासाठी हा उद्योग सक्षम व्हावा, म्हणून केंद्र सरकारच्या सहकार्याची मोठी गरज आहे.सोलापुरातील गारमेंट उद्योगाने गेल्या पाच-सहा वर्षांत खूप मोठा यशाचा पल्ला गाठला आहे. येथील युनिफॉर्म उद्योगाने दक्षिण भारतासह उत्तर भारतात मोठे मार्केटिंग केल्याने विविध राज्यांतून युनिफॉर्मची मागणी वाढली आहे.

परदेशातही सोलापूर गारमेंट उद्योगाचा दबदबा निर्माण झाला आहे. सोलापूर, बंगळूर, मुंबई व उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांतून येथील दर्जेदार उत्पादनांची मोठी प्रशंसा झाली आहे. मात्र, येथील उत्पादकांना येणाऱ्या अडचणींपैकी महत्त्वाचे म्हणजे विमानतळ तसेच कॉमन मार्केट पर्चेसिंगसाठी शासनाच्या मदतीची अत्यावश्‍यकता आहे.

सोलापुरातील गारमेंट उद्योगाची व त्यावर अवलंबून असलेल्या पर्यायी उद्योगांची वर्षाकाठी अंदाजे दोनशे कोटी रुपयांची उलाढाल होत असते. आणखी काही कालावधीनंतर आर्थिक व तांत्रिक दृष्टीने सोलापुरातील गारमेंट उद्योग सक्षम झाल्यास या उलाढालीत वाढ होईल; तसेच मोठ्या स्पर्धेत सहभाग घेता येईल.