नरेंद्र मोदी आणि शरद पवार शुक्रवारी सोलापुरात!

लोकसभेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्वच राजकीय पक्ष राजकीय वातावरण निर्मितीच्या तयारीला लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (ता.१९) सोलापुरात येणार असल्याचे गृहित धरून जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देखील शुक्रवारी सोलापूरच्या दौऱ्यावर येणार आहेत. सांगोला, मंगळवेढ्याचा दौरा करत पवार शुक्रवारी सोलापुरात मुक्कामी येणार आहेत.

नाशिक व मुंबईनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आठवड्यातच पुन्हा महाराष्ट्रात येणार आहेत. माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी कुंभारी येथे उभारलेल्या रे-नगर गृह प्रकल्पाच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी सोलापुरात येणार आहेत. या कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासनाने व माजी आमदार आडम यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यासाठी बैठका, नियोजन, सुरक्षा यासाठी प्रशाकीय यंत्रणेची लगबग सुरू झाली आहे. त्याच दिवशी शरद पवार हे सांगोल्यात कृषी प्रदर्शनाचे उद्‌घाटन, मंगळवेढ्यात सेंद्रिय पीकउत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. काँग्रेसनेते शिवाजीराव काळुंगे यांच्या पंचाहत्तरी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.

सांगोला व मंगळवेढ्याचा दौरा आटोपून शुक्रवारी रात्री शरद पवार सोलापूर शहरात येणार आहेत. त्या दिवशी हॉटेल बालाजी सरोवरमध्ये शरद पवारांचा मुक्काम असणार आहे. काँग्रेसचे माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांनी शनिवारी (ता. २०) आयोजित केलेल्या कार्यक्रमास ते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा सुनीता रोटे यांनी सलगर वस्तीत आयोजित केलेल्या महिला मेळाव्यास शरद पवार संबोधित करणार आहेत. शरद पवारांच्या या दौऱ्यात माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे हे देखील उपस्थित राहणार आहेत.अनेक वर्षानंतर पवार आणि शिंदे जिल्ह्यात एकाच व्यासपीठावर येणार आहेत. ज्या दिवशी नरेंद्र मोदी सोलापुरात येऊन जाणार आहेत, त्याच दिवशी पवार-शिंदे एकाच व्यासपीठावर येत असल्याने या कार्यक्रमातून आगामी राजकीय संकेत मिळण्याची शक्यता आहे.