आटपाडी तालुक्यात तीव्र पाणीटंचाई! डाळिंब बागा जळाल्या

आटपाडी तालुक्यात टेंभूचे पाणी आले आहे. पाणी आल्यामळे आटपाडी तालुक्याचा दुष्काळ हटण्यास मदत झाली आहे. मात्र, सर्वच भागात अद्याप पाणी पोहोचलेले नाही.आटपाडी तालुक्यात टेंभूचे पाणी पोहोचले असले तरी अद्याप सर्वत्र बंदिस्त पाइपलाइनची कामे पूर्ण क्षमतेने झाली नसल्याने शेकडो एकर डाळिंब बागा उन्हाच्या तडाक्याने व पाण्याअभावी जळून चालल्या आहेत.

परिणामी, शेतकरी वर्गाचे करोडो रुपयांचे नुकसान होऊ लागले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आटपाडी तालुक्यामध्ये बंद पाइपलाइनची कामे सुरू असून अनेक ठिकाणी बंदिस्त पाइपलाइनद्वारे टेंभूचे पाणी पोहोचले आहे. मात्र, सुविधा अद्याप शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचल्या नसल्याने शेतकऱ्यांची पिके कोमेजून गेली आहेत.

अद्यापही अनेक ठिकाणी पाणी पोहोचलेले नाही. लेंगरेवाडी (ता. आटपाडी) येथे पाण्याअभावी डाळिंब बाग वाळून गेली आहे. बंदिस्त पाइपलाइनचे काम धिम्या गतीने सुरू आहे, तर ज्या ठिकाणी बंदीस्त पाइपलाइनचे काम पूर्ण झाले आहे, अशा ठिकाणी पाण्याची मागणी करूनही पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे.