आटपाडी पंचायत समिती कार्यालयात गटशिक्षणाधिकारी मयूर हणमंत लाडे यांच्यावर संतोष सुखदेव हेगडे (रा. आवळाई , ता. आटपाडी ) याने शिवीगाळ करून मारहाणीची, तसेच ॲट्रॉसिटी दाखल करण्याची धमकी दिली. याप्रकरणी लाडे यांच्या फिर्यादीवरून हेगडे याच्याविरुधात आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, दि. ३० जुलै रोजी दुपारी गटशिक्षणाधिकारी मयूर लाडे हे आपल्या कार्यालयात असताना संतोष हेगडे हा माहिती अधिकाराच्या अर्जासंदर्भात अतिरिक्त माहिती मागण्यासाठी आला होता.
गटाधिकाऱ्यानी अर्जात नमूद नसलेली माहिती देऊ शकत नसल्याने त्यासाठी स्वतंत्र अर्ज करण्यास सांगितले. त्यावरून हेगडे याने कार्यालयातील कर्मचाऱ्यांसमोरच शिवीगाळ करत गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जात मारहाणीचा प्रयत्न केला . त्यांना जिवेमारण्याची व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. कागदपत्रे हिसकावून घेत गतिषिक्षणाधिकाऱ्यांना खुर्चीतून उठवून चित्रीकरण करून अपमानित केले. या घटनेचे साक्षीदार शिक्षण विस्तार अधिकारी अशोक विनायक म्हेत्रे यांनीही याबाबत तक्रार केली आहे.
