आटपाडीत आढळला काळ्या जातीचा नाग…

आटपाडी शहरातील विद्यानगर परिसरामध्ये गेल्या दोन दिवसांपूर्वी काळ्या रंगाच्या जातीचा नाग (ब्लॅक क्रोबा) आढळल्याने या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सर्पमित्र असलेल्या संतोष शिंदे यांनी या नागाला सुरक्षितरीत्या पकडत जीवदान दिल्याने या परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. विद्यानगर येथे राहत असलेले सिद्धार्थ मोटे यांच्या अंगणातील लाकडामध्ये काळ्या जातीचा विषारी नाग दोन दिवसांपूर्वी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास निघाला होता.

मोटे कुटुंबीय घाबरलेल्या अवस्थेमध्ये असताना सिद्धार्थ मोटे यांना सर्पमित्र संतोष राजेंद्र शिंदे यांच्याबद्दल माहिती मिळाली. त्यांनी शिंदे यांच्याशी संपर्क साधला. यावेळी सर्पमित्र संतोष शिंदे यांनी तत्काळ विद्यानगर येथील मोटे कुटुंबीयांचे घर गाठले.
यावेळी दुर्मीळ असा काळ्या रंगाचा साडेपाच फूट लांब विषारी नाग त्यांनी पकडला. हा नाग आटपाडी परिसरात प्रथमच सापडला असल्याचे शिंदे यांनी संगितले. आतापर्यंत पाच हजारांहून अधिक साप, नाग पकडले आहेत. मात्र प्रथमच ब्लॅक क्रोबा सापडला असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, आटपाडी परिसरामध्ये टेंभूचे पाणी आल्यापासून विषारी नाग व साप आढळण्याचे प्रकार वाढले आहेत.