पावसाळ्यापूर्वी जेसीबीच्या सहाय्याने नाले-गटारींची सफाई सुरू

यावर्षी मान्सूनचे आगमन लवकर होण्याचा अंदाज तसेच दोन दिवसापासून थांबून थांबून वळीव पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी वाळवा तालुक्यातील नाले गटारींची सफाई सुरु आहे. कुरळप (ता. वाळवा) गावातील नाले सफाई बरोबर गावाबाहेरील गटारी सुद्धा जेसीबीच्या साहाय्याने सरपंच डॉ. मदन शेटे यांनी प्रत्यक्ष थांबून स्वच्छ करून घेतल्या. गावातील सर्व नाल्यातील पाणी गावाबाहेरील ओढ्यात सोडले असल्याने पावसाळ्यामध्ये या गटारीचे पाणी मुख्य रस्त्यावर येत असते यामुळे नागरिक व प्रवाशांना ये-जा करण्यासाठी पाण्यातून मार्ग काढावा लागतो.

यासाठी कुरळप ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पावसाळा सुरू होण्यापूर्वीच गावाबाहेरील गटारीमधील झाडे झुडपे व गाळ काढून गटारी वाहती करण्याचे काम सुरू आहे. ही घाण ओढ्याच्या कडेला टाकण्याचे काम दिवसभर सुरू होते. तर गावाच्या पूर्वेला असणाऱ्या मुख्य ओढ्याची सुद्धा साफसफाई करून ग्रामपंचायतीने या ओढ्यावर ठिकठिकाणी बंधारे बांधून पाण्याची साठवणूक करावी अशी नागरिकांतून मागणी होत आहे.