राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावर होते. अजित पवारांची उपमुख्यमंत्री पदी निवड झाल्याने बारामती तालुक्यातील पणदरे गावात अजितदादांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी सभा संपल्यानंतर मराठा तरुणांनी अजित पवारांना घेराव घालत मराठा आरक्षणासंदर्भात प्रश्न विचारले.
याबाबत अधिक माहिती अशी की, उपमुख्यमंत्री पदी निवड झाल्याने अजित पवार यांचा बारामतीतील पणदरे येथे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी पणदरे गावच्या ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात अजित पवारांचे स्वागत केले. यावेळी अजित पवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. मात्र, सभा संपल्यानंतर मराठा समाजाच्या युवकांनी आरक्षणप्रश्नी उपमुख्यंत्री अजित पवार यांना जाब विचारला.
पणदरे येथे माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष केशवराव जगताप यांचा सत्कार समारंभ पवार यांच्या हस्ते पार पडला. सभेनंतर पवार तेथून बाहेर पडत असताना मराठा समाजाच्या विनोद जगताप व अन्य समाज बांधवांनी पवार यांना आरक्षण प्रश्नी विचारणा करत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली.
यावर पवार यांनी युवकांना आपली भूमिका समजावून सांगितली. कोणत्याही समाजाला धक्का न लगता आरक्षण दिले जाईल ही सरकारची भूमिका आहे. वेगवेगळ्या घटकांबरोबर मुख्यमंत्री यांनी बैठक घेतली आहे. यामध्ये माहिती घेतली असता मराठा समाजातील १० टक्क्यातील ८ टक्के लोक हे ईडब्लुएस चा लाभ घेतात असे पवार म्हणाले. तसेच कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण देणार असल्याचे अजित पवारांनी सांगितले.