Dry Day In Maharashtra : तळीरामांचा घसा राहणार कोरडा राज्यात तीन दिवस……

मद्यप्रेमींना या आठवड्याच्या अखेरीस पाण्यावरच तहान भागवावी लागेल. त्यांच्या घशाला दारुचा शेक बसणार नाही. महाराष्ट्रात या आठवड्याच्या अखेरीस सलग तीन दिवस दारुची दुकानं बंद राहतील. राज्यात तीन दिवस ड्राय डे असेल. या आठवड्यात शनिवारपासून ते पुढील आठवड्यातील सोमवारपर्यंत दारुची दुकानं बंद राहतील. तरबेज मद्यप्रेमींनी त्यासाठीची तजवीज अगोदरच केली असेल.

या कारणामुळे मद्यविक्री बंद असेल. लोकसभा निवडणूक 2024 मधील राज्यातील अखेरच्या टप्प्यातील, पाचव्या टप्प्यातील मतदान होत आहे. या काळात मुंबईसह परिसरातील दारुची सर्व दुकाने, आस्थापना बंद असतील. प्रशासनाने 18 ते 20 मेपर्यंत ड्राय डे ची घोषणा केली आहे. या काळात तळीरामांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याची अप्रत्यक्ष अपेक्षा आहे. तर कोणताही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.

अहवालानुसार, मुंबई शहरात 18 मे रोजी संध्याकाळी 5 वाजेपासून दारुची दुकाने आणि बार बंद असतील. 19 मे रोजी संपूर्ण दिवसभर दारु विक्री बंद असेल. 20 मे रोजी संध्याकाळी 5 वाजेनंतर दुकाने उघडतील. याशिवाय 5 जून रोजी सुद्धा ड्राय डे जाहीर करण्यात आला आहे. राज्यासह संपूर्ण देशात, होळी, दिवाळी, गांधी जयंती, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी रोजी अधिकृतरित्या ड्राय डे असतो. या दिवशी मद्यविक्री करण्यात येत नाही.