इचलकरंजी बसस्थानकात काँक्रीटीकरणाचे काम सुरू

इचलकरंजी येथील श्री शिवतीर्थ इचलकरंजी मध्यवर्ती बसस्थानक हे इचलकरंजी शहर व परिसरासह नजीकच्या सीमावर्ती भागासाठी मध्यवर्ती ठिकाण आहे. आम. प्रकाश आवाडे यांच्या प्रयत्नातून या श्री शिवतीर्थ इचलकरंजी मध्यवर्ती बसस्थानकाचे आधुनिकीकरण २ कोटी आणि वाहनतळ काँक्रिटीकरणासाठी ४ कोटी १८ लाखाचा निधी मंजूर आहे.

येथील श्री शिवतीर्थ इचलकरंजी मध्यवर्ती बसस्थानकाचे रुपडे पालटत आहेत. बसस्थानकातील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरु आहेत. त्यामुळे पूर्व बाजूकडील सर्वच फलाट बंद ठेवण्यात आले असून वाहतूक व्यवस्थेत काहीसा बदल करण्यात आला आहे.बसस्थानकातील मार्गाचे काँक्रिटीकरण सुरु झाले आहे.

तत्पूर्वी बसस्थानकाच्या पूर्वेकडील भाग उकरुन तेथे मुरुमीकरण करण्यात आले आहे. हे काम सुरु असल्याने इचलकरंजी आगाराने बसस्थानकात येणाऱ्या एस.टी. बसेसच्या थांब्यात काहीसा बदल केला आहे. तसेच कर्नाटक राज्यातील बसेसही मोठ्या प्रमाणात येत असतात. मात्र जागेअभावी त्यांना शहर वाहतूक नियंत्रण शाखा कार्यालयाच्या बाजूस छत्रपती संभाजी महाराज चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर तात्पुरता थांबा करुन देण्यात आला आहे.