इचलकरंजी शहराला भेडसावणारा पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी! आ. डॉ. राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्यातून ६.४२ कोटीचा निधी मंजूर

इचलकरंजी शहराचा पाणीप्रश्न हा जगजाहीर आहे. पाण्याची तीव्र टंचाई शहरात जाणवते. सतत होणाऱ्या गळती, पंचगंगा प्रदूषण अशा अनेक कारणामुळे शहरवासीयांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. माजी आमदार प्रकाश आवाडे व आमदार राहुल आवाडे यांनी कृष्णा ‘योजना बळकटीकरणासह मजरेवाडी व पंचगंगा कट्टीमोळा येथील मशिनरी बदलण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून शासन दरबारी पाठपुरावा सुरु ठेवला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळून ६.४२ कोटीचा निधी मंजूर झाला आहे.

यामध्ये ट्रान्सफार्मर व व्हर्टीकल टर्बाइन पंप बसविणेसाठी ४.३९ कोटी, मजरेवाडी येथे उच्चदाब केबल व सीसीटिव्हीसाठी ७७.२४ लाख, नवीन पंपहाऊसमध्ये बसबार, विद्युत व्यवस्था व ईवोटी क्रेनसाठी ८९.९६ लाख आणि कट्टमोळा येथे सीसीटिव्ही केबल व विद्युत व्यवस्थेसाठी ३५.१७ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. ही कामे गतीने पूर्ण केली जाणार आहेत. त्यामुळे शहराला सातत्याने भेडसावणारा पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे.