अभिजित पाटील यांचे वाळवा येथील हुतात्मा चौकात महालक्ष्मी ट्रेडर्स नावाचे हार्डवेअर दुकान आहे. पूर्वी विजय नवले यांनी दाखल केलेल्या एका गुन्ह्यात अभिजित पाटील हे साक्षीदार आहेत. न्यायालयामध्ये सुरू असलेल्या गुन्ह्यातील साक्ष मागे घेण्यासाठी वाळवा, तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे दोघाजणांनी हुतात्मा चौकातील महालक्ष्मी ट्रेडर्स नावाचे हार्डवेअर दुकान पेटवले. फिर्यादी साक्षीदाराच्या घरासमोर लावलेल्या कारच्या काचा फोडून लाखो रुपयांचे नुकसान केले. याप्रकरणी दुकानमालक अभिजित सुरेश पाटील (रा. माळी नगर वाळवा) यांनी आष्टा पोलिसात फिर्याद दिली.
फिर्यादित ३५लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद केले आहे. फिर्यादीनुसार अष्टा पोलीस ठाण्यात अजिंक्य पाटील उर्फ ए.डी (रा. हाळबाग वाळवा) व सुरज जनार्दन पाटील (रा. मळी भाग वाळवा) या दोघां संशयीतावरती गुन्हा नोंद झाला आहे.
त्यांनी साक्ष मागे घ्यावी, या कारणावरून मंगळवारी ता १४ रोजी दुपारी संशयित अजिंक्य पाटील व सूरज पाटील यांनी महालक्ष्मी ट्रेडर्स दुकानाच्या पूर्वेकडील अडीच फुटाचे शटर उचकटून दुकानास आग लावली.
तसेच अभिजित पाटील यांनी आपल्या घरासमोर लावलेल्या त्यांच्या मालकीची अल्टरोज कार (एम. एच. १०, डी. यु. ०५०६ ) ची मागील बाजूची काचा फोडून दुकान व कारचे मिळून सुमारे ३५ लाख रुपयांचे नुकसान केले. आष्टा पोलिस प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.