गेल्या आठ-दहा दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे पंचगंगा नदीला पूर आला. शहरातील नदीकडील नागरी वसाहतीत पुराचे पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांचे स्थलांतर सुरू झाले. महापालिकेने एकूण १४ निवारा केंद्रांची सोय केली होती. घोरपडे नाट्यगृहापासून त्याची सुरुवात झाली.
पुराने धोका पातळी ओलांडल्यानंतर नागरिकांचे मोठ्या प्रमाणात सुरक्षितस्थळी स्थलांतर केले. यातील बरीच कुटुंबे निवारा केंद्राऐवजी नातलगांसह मित्रमंडळींकडे राहण्यास गेली आहेत. त्यामुळे स्थलांतरित पूरग्रस्त कुटुंबांचा नेमका आकडा समोर येत नव्हता. केवळ निवारा केंद्रात दाखल झालेल्या कुटुंबांची माहिती महापालिका प्रशासनाकडे होती.
दरम्यान, पावसाने उघडीप दिल्यानंतर पूर ओसरण्याच्या मार्गावर आहे. त्याप्रमाणे पूरग्रस्त नागरिकांनाही आपल्या घराकडे परतण्याचे वेध लागले आहेत. मात्र आज अचानक पूरग्रस्त नागरिकांची संख्या वाढल्याचे समोर आले आहे. पाणी वाढले नसताना एकदम ८५ कुटुंबांची वाढ महापालिकेने दिलेल्या माहितीतून समोर आली आहे.
त्यामुळे निवारा केंद्रांची संख्या आठवरून १० झाली आहे. याबाबत आता तर्क -वितर्क करण्यात येत आहेत. पूरग्रस्त नागरिकांना शासनाकडून आर्थिक मदतीची मागणी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पूरग्रस्त कुटुंबांच्या वाढलेल्या संख्येच्या घडामोडीला विशेष महत्त्व आले आहे.