CSK vs RCB सामन्यांची ऑनलाइन तिकीट खरेदी करणे पडले महागात! ३ लाख रुपयांची फसवणूक

चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या शनिवारी आमनेसामने येणार आहेत. हा सामना एखाद्या एलिमिनेटरपेक्षा कमी नसल्यामुळे, या सामन्याबाबत संपूर्ण भारतात जबरदस्त वातावरण आहे.जवळपास प्रत्येक क्रिकेटप्रेमी हा सामना पाहण्यासाठी मैदानावर जाण्यास इच्छुक आहे. त्यामुळेच तिकिटांसाठी जोरदार स्पर्धा सुरू झाली आहे. आता तिकीट खरेदीच्या प्रक्रियेत एका व्यक्तीची हजारो नव्हे, तर ३ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, तिकीट खरेदी करण्याचा प्रयत्न करत असताना एक चाहता फसवणूक करणाऱ्या एजन्सीच्या गळाला लागला आहे. ज्यामुळे त्याची ३ लाख रुपयांची फसवणूक झाली. इन्स्टाग्रामवरील एका अकाऊंटवरून ही स्टोरी पोस्ट करण्यात आली आहे. ज्यामध्ये तिकिटांच्या उपलब्धेबाबत विचारण्यात आले होते. तिकिटांची विक्री करणाऱ्या व्यक्तीने स्वत:चे नाव पद्म सिन्हा विजय कुमार असे सांगून स्वत:ला आयपीएल तिकिटे विकणारा अधिकृत कर्मचारी असल्याचे सांगितले आहे.