महानगरपालिकेच्या बंद शाळेस आग!

इचलकरंजी नगरपरिषदेच्या माध्यमातून गोरगरीब होतकरु विद्यार्थी-विद्यार्थीना मोफत शिक्षण मिळावे यासाठी भागाभागात प्राथमिक शाळा सुरु करण्यात आल्या. परंतु कालांतराने प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे यापैकी बहुतांशी शाळा बंद झाल्या आहेत. या बंद झालेल्या शाळा इमारतींकडेही नगरपरिषद असो किंवा आताची महापालिका असो दुर्लक्ष केले जात असल्याने चांगल्या इमारती व तेथील वस्तूंची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.

अशीच एक बंद असलेली शाळा इमारत सम्राट अशोकनगर परिसरात आहे. श्रीमती इंदिरा गांधी वि.मं.क्र. २६ ही शाळा इमारत प्रदीर्घकाळापासून बंद असून ती मद्यपी आणि नशेखोरांचा अड्डा बनत चालली आहे. या इमारतीच्या खोल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे. अशाच एका खोलीत शुक्रवारी दुपारच्या सुमारास अचानकपणे आग लागली. आगीची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत आग आटोक्यात आणली.

परंतु ही आग कोणी लावली किंवा कशामुळे लागली हे कोडेच आहे. कित्येक वर्षापासून बंद असलेल्या या इमारतीची दुरवस्था झाली असून ती नशेखोर व मद्यपींचा अड्डा बनली आहे. तत्कालीन परंतु या बंद शाळेच्या इमारतीत आग कशी लागली की कोणी लावली याचा शोध घेण्याची गरज आहे. शिवाय परिसरातील मुले याठिकाणी सर्रास खेळत असतात.

या इमारतीतील खोल्यांचे दरवाजे, खिडक्या पूर्णतः खराब झाल्याने खेळणाऱ्या मुलांना धोका होऊ शकतो. या सर्व बाबींचा गांभिर्याने विचार करुन महापालिका प्रशासनाने या बंद इमारतींचा चांगल्या कामांसाठी अथवा उत्पन्न वाढीच्या दृष्टीने योग्य तो विचार करण्याची गरज आहे.