खानापूर घाटमाथ्यासाठी वरदान ठरलेला विजापूर-गुहागर महामार्ग या परिसरातील वन्य प्राण्यांसाठी मात्र मृत्यू मार्ग ठरू लागला आहे. खानापूर जवळील पंचकुल ते बेनापूर फाटा या परिसरात माळरान जमिनी, झाडे-झुडपे व विरळ मानवी वस्ती असल्यामुळे या परिसरातून वन्य प्राणी महामार्ग ओलांडून सुलतानगादे तलावाकडे पाणी पिण्यासाठी येतात. महामार्गाचे काम या परिसरात झाल्यामुळे या परिसरातून वाहनधारक सुसाटपणे गाड्या चालवत असतात. त्यामुळे गेल्या दोन-तीन महिन्यांपासून या परिसरात वाहनांच्या धडकेत वन्य प्राण्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून या परिसरात वाहनांच्या धडकेत वन्य प्राण्यांच्या मृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. खानापूर घाटमाथा हा डोंगर परिसराने व्यापलेला आहे. या परिसरात हजारो एकर गायरान जमीन आहे. रामघाट परिसरात वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आढळतो. घाटमाथ्यावर वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात आढळतात. उन्हाळ्यात हे प्राणी खानापूर घाटमाथ्यावरील सुलतानगादे तलावाकडे पाणी पिण्यासाठी येतात.
उन्हाळ्यात रात्री व पहाटे या परिसरातून जाणाऱ्या वाहनधारकांना व नागरिकांना या वन्य प्राण्यांचे दर्शन सातत्याने होत असते. तलावाकडे येण्यासाठी या प्राण्यांना महामार्ग ओलांडून यावे लागते. त्यामुळे वावर असणाऱ्या भागात वनविभागाने परिसरात कृत्रिम पाणवठे तयार करावेत अशी मागणी आता खानापूर घाटमाथ्यावरील वन्य प्राणिप्रेमींकडून केली जाऊ लागली आहे.